रविवार, १९ जून, २०११

पु.ल.देशपांडे


पु.ल.देशपांडे
साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व आदी क्षेत्रांत ज्यांना अभिव्यक्तीची ‘अमृतसिद्धी’ साध्य झाली होती आणि ज्यांची ‘साठवण’ मराठीजनांनी अनंत काळासाठी मनामनात करून ठेवली आहे असे ‘आनंदयात्री’!
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान... आदी भावनांचं सर्वाधिक प्रकटीकरण ज्यांच्याबाबत महाराष्ट्रानं अनुभवलं ते व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे! त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. लेखनातही तोचतोचपणा नाही. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. गांधीजींचं चरित्रलेखन, बंगाली भाषेचा अभ्यास, रवींद्रनाथांच्या कवितांचा अनुवाद याही वेगळ्या प्रकारच्या लेखनातून पु. ल. आपल्याला भेटतात. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय.... कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन... या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला.

वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे ‘कोट्याधीश’ पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले.

पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’  म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले.

भास्कर संगीतालयाच्या दत्तोपंत राज्योपाध्यांकडून घेतलेलं हार्मोनियमचं शास्त्रीय शिक्षण हा  पु. लं. चा आणखी एक पैलू. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, मिल्लिकार्जुन मन्सूर अशा दिग्गजांना त्यांनी हार्मोनियमवर समर्थ साथ केली. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफितीही उपलब्ध आहेत.

सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वार्‍यावरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं.

राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला.

पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं दिसतात. त्यांच्या लेखनासह, वक्तृत्वातही संदर्भांची श्रीमंती जाणवते. संस्कृत सुभाषिते, वेद-पुराणे, संतसाहित्य, म्हणी-वाक्‌प्रचार, यांसह विविध संस्कृतींमधले, जीवनव्यवहारातले अनेक संदर्भ पु. लं. च्या समृद्ध लेखनात आढळतात. यामुळेच त्यांची निवेदन-शैलीही उठून दिसते!

साहित्य-नाटक-संगीत या क्षेत्रात प्रवेश करणार्‍या नवोदिताला शाबासकीची थाप द्यावी ती पु.लं. नीच. ‘ती फुलराणी’ करताना भक्ती बर्वे-इनामदारांना हाच अनुभव आला. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचं गायन ऐकून ते आवडल्याचं कळवणारा फोन रात्री ११:०० वाजता करून प्रोत्साहन देणारे पु. ल. वेगळेच. तरुण संगीतकार सलील कुलकर्णींच्या बालगीतांच्या ध्वनिमुद्रिकेचं भरभरून कौतुक करणारे पु. ल. च होते. मुस्लीम समाजात काम करणार्‍या हमीद दलवाईंबद्दल पहिल्यांदा पु. लंनीच लिहिलं. एका अनोळखी दिग्गजाची ओळख सामान्य वाचकांना करून दिली. समोरच्या व्यक्तीमधल्या चांगल्या गोष्टी ओळखून त्या इतरांना सांगण्याची क्षमता फार कमी लोकांकडे असते आणि त्यापैकी एक पु. ल. होते.

पु.लं. मधला दाता खूप जणांना अनोळखी असेल. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणार्‍या पु. ल. व सुनीताबाई या दांपत्याने बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. सुनिताबाईंसारख्या सहधर्मचारिणीच्या प्रयत्नातून पु. ल. देशपांडे फाउंडेशन उभं राहिलं. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पुढील संस्था - व्यक्तींना मदत केली.

-  अंध व्यक्तींसाठी देणगी - उत्तमोत्तम मराठी साहित्य ब्रेल लिपीत आणण्यासाठी आर्थिक मदत.
-  वेश्यांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या निहार या संस्थेला सहकार्य.
-  कोयना भूकंपग्रस्त मुलांसाठी मदत.
-  ग्रामीण स्तरावरील शास्त्र प्रयोगशाळेलाही मदत.
-  मुंबई येथील एशियाटिक सोसायटी या संस्थेला सहकार्य.

कलाक्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे पु. ल. देशपांडे पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. पु. लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. मध्य प्रदेश, कलकत्ता, गोवा या राज्यांतूनही पु. लं. ना पुरस्कार मिळाले आणि हा मराठी साहित्यिक भौगोलिक, भाषिक व सांस्कृतिक  सीमा ओलांडून पार गेला.

‘जिवंत माणसाइतके जगात पाहण्यासारखे काही नाही’, अशी जीवनाकडं बघण्याची त्यांची वृत्ती आपले आयुष्य आणखी सुंदर बनवते. जीवन सुंदर करू पाहणार्‍या चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्या जीवनातून व अभिव्यक्तीतूनही स्पष्टपणे जाणवतो. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ ही म्हटले जाते. अवघ्या महाराष्ट्रावर प्रदीर्घ काळ आनंदाची उधळण करणारा हा आनंदयात्री १२ जून, २००० ला जग सोडून गेला खरा, पण त्यांचं अस्तित्व आजही मराठी मनात शाबूत आहे. 

शनिवार, ४ जून, २०११

सचिन तेंडुलकरसचिन तेंडुलकर


गोर्‍या सायबाचा खेळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्रिकेटवर गेली वीस वर्षे आपल्या असामान्य खेळाने, अनेक विक्रम करत अधिराज्य गाजवणारा खेळाडू म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. यांचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर हे मराठीचे प्राध्यापक आणि प्रसिद्ध साहित्यिक. मध्यमवर्गीय, सुसंस्कृत मराठी कुटुंबातून आलेल्या सचिनला क्रिकेटमध्ये करिअर करायची संधी मिळणे, घरातून तसे प्रोत्साहन मिळणे हे सचिनचे नव्हे तर आपणा सर्व भारतीय क्रिकेट रसिकांचे भाग्यच म्हणायला हवे. सचिन यांचा जन्म मुंबई येथे झाला. घरात लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच क्रिकेटची आवड असल्यामुळे क्रिकेटविषयक अनेक गोष्टी लहानपणीच त्यांच्या कानावरून गेल्या होत्या. त्यांच्या भावाने - अजितने - त्यांच्यातील क्रिकेटचे कौशल्य ओळखून त्यांना योग्य वयात रमाकांत आचरेकर यांच्याकडे क्रिकेटचे शास्त्रशुद्ध तंत्र शिकवण्यास पाठवले आणि त्यांच्यातील सुप्त खेळाला योग्य प्रशिक्षणाची जोड मिळाल्यावर त्यांचा खेळ लहान वयातच अधिक परिपक्व बनत गेला. शारदाश्रम विद्यालयाचा, छोट्या चणीचा हा मुंबईकर खेळाडू लहानपणापासूनच मुंबई गाजवू लागला.

सचिन यांनी आपल्या आंतरशालेय क्रिडाजीवनापासूनच विश्वविक्रम करण्यास सुरुवात केली. १९८५-८६ ला आंतरशालेय हॅरिस शिल्ड स्पर्धेमध्ये वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी मित्र विनोद कांबळी यांच्यासह ६६४ धावांचा पर्वत रचला. त्यापैकी ३२६ धावा त्यांनी स्वत: काढल्या होत्या. सचिन १५ व्या वर्षीच रणजीमध्ये पदार्पण करणारे पहिले खेळाडू होत.  सचिन हे एकमेव असे क्रिकेटपटू आहेत की ज्यांनी रणजी, दुलीप आणि इराणी या तिन्ही राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शतकी खेळी केली आहे.

सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या १६ व्या वर्षी - १९८९ साली - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात (कराची येथे) पदार्पण केले. सचिन यांची एकदिवसीय कारकीर्द १९८९ मध्येच पाकिस्ताविरुद्धच सुरू झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विक्रमवीराला एकदिवसीय सामन्यातील आपले १ ले शतक नोंदवण्यासाठी तब्बल ७८ सामने खेळावे लागले. १९९४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्यांनी प्रथम शतकी खेळी केली. त्यानंतर एकदिवसीय शतकांच्या विक्रमाकडे होणारा त्यांचा वेगवान प्रवास खरोखरच थक्क करून सोडणारा आहे.

आपले पहिले  तब्बल ३५ कसोटी सामने विदेशातील मैदानावर खेळणार्‍या सचिन यांनी १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध कोलकता येथे भारतीय मैदानावरील पहिली कसोटी खेळली.  या मालिकेतील दुसर्‍या सामन्यात (चेन्नई येथे) १६५ धावा काढून मायभूमीतील आपले १ ले कसोटी शतक त्यांनी झळकावले. त्याआधी त्यांनी १९९० मध्येच इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे पहिले कसोटी शतक झळकावून धावांचा - शतकांचा रतीब घालण्यास सुरुवात केलीच होती.

सचिन यांनी आपल्या झंझावाती, वेगवान खेळीने अनेक वेळेला आपल्या संघाला पराभवापासून सावरले आहे, असंख्य वेळा विजयी केले आहे. भारतीय क्रिकेट रसिकांच्या मनाला सर्वाधिक भिडलेली त्यांची खेळी म्हणजे ‘डेझर्ट स्टॉर्म’ म्हणून प्रसिद्ध असलेली, शारजा येथील कोकाकोला कपच्या उपान्त्य सामन्यातील खेळी होय. ऑस्ट्रेलियाच्या २८४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था ४ बाद १४३ अशी झाली होती. त्याच वेळी भरीस भर म्हणून मैदानावर  तुफान वादळ सुटले होते. या वादळाला सचिन ‘वादळ’ होऊनच सामोरे गेले. सचिन यांनी ५ षटकार आणि ९ चौकार फटकावून १३१ चेंडूत १४२ धावांची खेळी करून संघाला अंतिम फेरीपर्यंत नेले.  एवढेच नव्हे तर त्यानंतर दोन दिवसातच अंतिम सामन्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्यांच्या १३१ चेंडूतील १३४ धावांनी भारताला विजय प्राप्त झाला. ऑस्ट्रेलिया संघात मॅकग्रा, शेन वॉर्न हे जगप्रसिद्ध, अचूक गोलंदाजी करणारे गोलंदाज असताना सचिन यांनी या धावा केल्या. त्यामुळे या त्यांच्या खेळींचे महत्त्व अधोरेखित होते.

१९९४ ला न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्यांनी आघाडीचा फलंदाज म्हणून कामगिरी करण्यास सुरुवात केली आणि जगाला एक उत्तम, आक्रमक आघाडीचा फलंदाज अनुभवण्यास मिळू लागला. सौरव गांगुली व वीरेंद्र सेहवाग या त्यांच्या जोडीदारांचा खेळ बहरण्यामध्ये सचिन यांच्या ‘समोर’ असण्याचा मोठा वाटा आहे.

कोणत्याही परिस्थितीत आपल्या देशाशी आणि खेळाशी बांधिलकी मानणारे सचिन व्यक्तिगत विक्रमापेक्षा संघाला, सांघिक कामगिरीला, देशाच्या विजयाला अधिक महत्त्व देतात. एका विश्र्वचषक स्पर्धेच्या वेळी त्यांचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांचे निधन झाले. त्या वेळी फक्त एका सामन्यात सचिन अनुपस्थित राहिले. संघाला असणारी आपली गरज आणि खेळाबद्दलची बांधिलकी यांचा विचार करून पुढील केनियाविरुद्धच्या सामन्यात ते लगेचच सहभागी झाले. या सामन्यात त्यांनी शतकही झळकावले. तसेच त्यांना सामनावीर म्हणून पुरस्कारही मिळाला. २००३ मध्ये झालेल्या विश्र्वचषक स्पर्धेत सचिन यांनी विविध सामन्यांत मिळून ६७३ धावा काढल्या व भारताला अंतिम सामन्यात पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेत त्यांना  सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला.

सचिन यांच्या प्रत्येक खेळीवर प्रतिस्पर्धी, आकडेवारी तज्ज्ञ, समालोचक, क्रीडा समीक्षक आणि जगभरातील क्रीडारसिक यांचे बारीक लक्ष असते. असंख्य लोकांची त्यांच्या धावा, बळी, त्यांचे विक्रम याबाबतची आकडेवारी तोंडपाठ असते.

- आत्तापर्यंतची २० वर्षांची कारकीर्द; अजूनही खेळण्याची क्षमता;
- आंतरराष्ट्रीय कसोटी व एकदिवसीय सामने मिळून सुमारे ५८० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व, या सामन्यांतून एकूण सुमारे १२०० दिवस मैदानावरील चैतन्यदायी उपस्थिती, (प्रथम श्रेणीचे २५८ सामने आणखी वेगळेच),
- कसोटी व एकदिवसीय या दोन्ही प्रकारांत मिळून काढलेल्या एकूण २९००० धावा (प्रथम श्रेणीतील २१००० धावा वेगळ्याच), या दोन्ही प्रकारांत धावांच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांक;
- दोन्ही प्रकारात सर्वाधिक शतके (जानेवारी, २००९ पर्यंत एकूण ८३ शतके), (प्रथम श्रेणीतील ६८ शतके निराळीच); (स्वत:च्या एकूण कसोटी व एकदिवसीय शतकांपैकी सर्वात जास्त शतके सर्वोत्कृष्ट अशा ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झळकावलेली आहेत हे विशेष महत्त्वाचे), सर्वाधिक एकदिवसीय अर्धशतके;
- सर्व विश्र्वचषक स्पर्धांचा विचार करता एकाच स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम (२००३ साल - ६७३ धावा), तसेच सर्व विश्र्वचषक स्पर्धांमध्ये मिळून एकूण १७९६ धावांसह सर्वाधिक धावांचा विक्रम, एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा (५६) सामनावीर पुरस्कार व सर्वाधिक वेळा (१४) मालिकावीर पुरस्कार, एकदिवसीय सामन्यांत कॅलेंडर वर्षात १००० पेक्षा जास्त धावा काढण्याची सर्वाधिक वेळा केलेली कामगिरी...

ही विक्रमांची यादी भारतीय व मराठी माणसाला अभिमान वाटावी अशी आहे आणि प्रतिस्पर्ध्यांच्या मनात धडकी भरवणारी आहे. या आकड्यांच्या व विक्रमांच्या जोडीला कसोटी व एकदिवसीय सामन्यांतील सचिन यांचे एकूण १९६ बळी व एकूण २२८ झेल आहेतच. त्यांच्या  ४२ एकदिवसीय शतकांच्या  सामन्यांपैकी एकूण ३० सामने भारताने जिंकलेले आहेत, तसेच त्यांनी सुमारे ५६ वेळा मिळवलेल्या सामनावीर पुरस्कारांच्या सामन्यांपैकी एकूण ५१ सामने भारताने जिंकले आहेत. यावरूनच त्यांची वैयक्तिक कामगिरी आणि भारताची विजयी कामगिरी यांमधील संबंध स्पष्ट होतात. खरे तर आता सचिन यांची महानता या सर्व आकडेवारीच्या पलीकडे पोहोचलेली आहे.

सर डॉन ब्रॅडमन यांच्या स्वप्नातील विश्र्व संघामधील या पिढीतील एकमेव नाव म्हणजे सचिन तेंडुलकर. एका क्रिकेटपटूसाठी यापेक्षा दुसरा बहुमान कोणता असू शकतो. कोणत्याही परिस्थितीत न डळमळता शांत आणि संयमी खेळी खेळणे हे सचिन यांचे वैशिष्ट्य. वर्तमानपत्रांतून त्यांच्याविरुद्ध काही छापून आले, कोणी काही टीका केली, प्रतिस्पर्ध्यांनी कितीही डिवचले, तरी कोणतीही प्रतिक्रिया न देणारे सचिन टीकाकारांना नेहमीच आपल्या फलंदाजीने उत्तर देतात. याचेच एक उदाहरण म्हणजे मोहाली येथील सामन्यात त्यांनी साकारलेला विश्र्वविक्रम. ऑस्ट्रेलियन खेळाडू त्यांच्या नेहमीच्या संकुचित वृत्तीने ‘सचिनला वर्ल्ड रेकॉर्ड करूच देणार नाही’, अशा वल्गना करत होते. सचिन यांनी त्या वेळी कोणतेही प्रत्युत्तर न देता शांतपणे १११ चेंडूत ८८ धावा काढल्या आणि  ब्रायन लाराचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला.

भारतीय कप्तानांना आणिबाणीच्या प्रसंगी निर्णय घेताना सचिन यांचे मार्गदर्शन नेहमीच उपयोगी पडले आहे. अत्यंत नम्र‘, निगर्वी, शांत, संयमी असा हा खेळाडू आपल्यापेक्षा कनिष्ठ असणार्‍या खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळतानाही तेवढ्याच निगर्वीपणे व सहकार्याने खेळत असतो. भारतीय संघाकडून खेळणार्‍या प्रत्येक नव्या खेळाडूला सांभाळून घेणे, प्रसंगी मार्गदर्शन करणे व प्रोत्साहन देणे - कौतुक करणे या सचिन यांच्या कृतींतून त्यांच्या व्यक्तित्वाचा वेगळाच पैलू समोर येतो. आपल्या अनुभवाचा उपयोग सगळ्यांना व्हावा याकडे त्यांचे लक्ष असते.

हे झाले त्याच्या स्वभावगुणांविषयी. एक परिपूर्ण फलंदाज म्हणून त्यांच्याकडे  स्वत:ची एक खास शैली आहे. स्ट्रेट ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह, स्क्वेअर कट हे त्यांचे विशेष प्रेक्षणीय फटके होत. शिवाय उपखंडातील फलंदाजांमध्ये ‘ऑन साईडला’ फटकेबाजी करण्याचे तंत्र असते, ते त्यांच्याकडे विशेष कौशल्यासह आहेच. तंत्रशुद्धता आणि आक्रमण यांचे अतिशय सुरेख संतुलन हे सचिन यांचे प्रमुख वैशिष्ट्य होय. यांच्या जोडीला परिस्थितीचे आकलन, संयम, कल्पकता, सर्जनशीलता... इत्यादी गुण त्यांच्याकडे आहेतच. त्यांच्या कल्पकतेचे व सर्जनशीलतेचे उदाहरण म्हणजे पॅडल स्वीपचा फटका आणि शोएब अखतर, ब्रेट ली, मायकेल जॉन्सन या जलदगती गोलंदाजांनी उसळता चेंडू (बाऊन्सर) टाकल्यास बॅट उंचावून, चेंडूच्या वेगाचा फायदा घेत, थर्डमॅनच्या डोक्यावरून ठोकलेला षटकार होय. या फटक्यांमुळे अनेक जगप्रसिद्ध गोलंदाज निष्प्रभ व निरुत्तर ठरत आहेत. खेळपट्टीचा पटकन येणारा अंदाज, गोलंदाजाच्या हाताच्या हालचालीवरून चेंडूचा क्षणार्धात अंदाज घेण्याची क्षमता, उत्तम पदलालित्य, भेदक नजर, प्रतिस्पर्धी-प्रेक्षक-एकूण परिस्थिती यांचा दबाव पेलण्याची ताकद... आदी सर्व गुणधर्म व कौशल्यांमुळेच सचिन हे क्रिकेटविश्र्वातील सार्वकालिक सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटुंपैकी एक ठरतात. मैदानावर १००% एकाग्रता व उत्तम खेळाचे सातत्य आणि अविश्वसनीय शारीरिक क्षमता (फिटनेस) या त्यांच्या आणखी काही वैशिष्ट्यांमुळेच ते एक आदर्श मानले जातात.

सचिन तेंडुलकर हे जगातील काही अष्टपैलू खेळाडूंमध्येही गणले जातात. त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीबरोबरच त्यांचे गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातील कौशल्यही वाखणण्याजोगे आहे. कोणत्याही प्रकारच्या खेळपट्टीवर ते दोन्ही बाजूंना सहजतेने चेंडू वळवून गोलंदाजी करू शकतात. भल्याभल्या फलंदाजांचा गोंधळ उडविण्याची क्षमता त्यांच्या गोलंदाजीत आहे. ज्या वेळी संघाला एखादा बळी अत्यावश्यक असतो, त्या वेळी सचिन यांच्याकडे अपेक्षेने गोलंदाजी सोपवली जाते व ते त्यात यशस्वी होतात. या सर्व गुणांमुळेच सचिन यांच्याकडे नेहमीच संघाचा ‘आधारस्तंभ’ म्हणून पाहिले जाते. त्यांचे मैदानावर केवळ ‘असणे ’च भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य वाढवते.

जगातील जवळजवळ सर्व मैदानांवर (सुमारे ९०) आपल्या सर्वोत्तम व परिपूर्ण खेळाचे प्रदर्शन करणार्‍या सचिन तेंडुलकर यांना अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सुमारे १० वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत पहिल्या १० खेळाडूंत स्थान मिळविण्याची कामगिरी त्यांनी केली आहे. विस्डेनचा क्रिकेटर ऑफ दी इयर पुरस्कार, भारतातील पद्मविभूषण, पद्मश्री, अर्जुन व राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार.... ही बहुमानांची यादीही त्यांच्या विक्रमांइतकीच मोठी आहे. पण सर डॉन ब्रॅडमन यांच्या पत्नीने, ‘मला सचिनच्या खेळात ब्रॅडमन यांचा भास होतो’, अशी दिलेली प्रतिक्रिया आणि स्वत: सर ब्रॅडमन यांनी प्रत्यक्ष भेटीत केलेले कौतुक हाच सचिन यांच्यासाठीचा सर्वोच्च पुरस्कार आहे असे म्हणता येईल.

गेली २० वर्षे क्रिकेट विश्वात सातत्याने आपला ठसा उमटवणे ही काही साधी गोष्ट नव्हे. तसेच करोडो भारतीय क्रिडा रसिकांच्या अपेक्षांचे ओझे पेलत सातत्यपूर्ण कामगिरी करणे म्हणजे एक अग्निदिव्यच! अनेक विक्रम करताना, अनेक पुरस्कार भूषवताना आणि स्लेजिंगचा जमाना असताना आपल्या विनम्र‘ वागणुकीने भारतातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये सचिन यांनी अढळ स्थान निर्माण केले आहे. सचिन तेंडुलकर हे आता केवळ एक क्रिकेट खेळाडू राहिले नसून ते भारताचे ‘क्रीडा राजदूत’ मानले जातात, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे ते एक ‘सुप्रसिद्ध क्रीडा आयकॉन (प्रतिमान)’ बनले आहेत. भारताला विजयाची सवय लावणार्‍या सचिन यांच्या पुढील कारकीर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!

दृष्टिक्षेपात सचिन तेंडुलकर यांची कारकीर्द - (जानेवारी, २००९ पर्यंत)
 सामनेधावाशतकेअर्धशतकेसरासरी* स्ट्राईक रेटबळीझेल
कसोटी१५६१२४२९४१५१५४.२७--४२१००
एकदिवसीय
सामने
४२२१६४४०४२९०४३.९५८५.३९१५४१२८
 (*प्रत्येक १०० चेंडूंमागे धावांची संख्या.)

पंडित भीमसेन जोशीपंडित भीमसेन जोशी


अमृताचे डोही। बुडविले तुम्ही, बुडताना आम्ही। धन्य झालो।।
मी पण संपले। झालो विश्वाकार, स्वरात ओंकार। भेटला गा।।
हे आहेत ‘ज्ञानपीठा’ने  ‘भारतरत्ना’बद्दल काढलेले उद्‌गार, म्हणजेच कविवर्य विंदा करंदीकर यांची पंडित भीमसेनजींवरील प्रतिक्रिया!

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात ख्याल गायकीचा राजा म्हणून पंडित भीमसेन जोशींना ओळखले जाते. पंडित भीमसेनजी हे पारंपरिक किराणा घराण्याचे वारसदार आहेत. या घराण्याच्या गायकीचे प्रगल्भ रूप भीमसेनजींच्या गाण्यातून प्रकट होते. भारतीय शास्त्रीय संगीत देशात आणि परदेशात लोकप्रिय करण्यामध्ये भीमसेनजींचे मोलाचे योगदान आहे.

भीमसेनजींचा जन्म कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातील गदग या गावी झाला. भीमसेनजींचे संगीतावरील प्रेम इतके विलक्षण होते की, लहानपणी ते सुरांच्या ओढीने मशीदीत जाऊन बसत. तसेच शाळेत जाता-येता तासनतास रेकॉर्डच्या दुकानापाशी उभे राहून गाणी ऐकत व तशीच्या तशी ती गाणी म्हणत. लहानपणापासून संगीताची आवड असणार्‍या भीमसेनजींनी वयाच्या १२ व्या वर्षी संगीत शिक्षणासाठी घर सोडले. रिकाम्या खिशाने व उपाशी पोटाने त्यांनी मैलोनमैल प्रवास केला. अब्दुल करीम खाँ, वझे बुवा, केसरबाई केरकर यांसारख्या मातब्बर गवयांचे गाणे त्यांनी ऐकले. मिळेल तिथून गायनविद्या ग्रहण केली. अनेक गुरूंचे शिष्यत्व पत्करले व शेवटी रीतसर  रामभाऊ कुंदगोळकर(सवाई गंधर्व) यांच्याकडून तालीम घेतली. कुंदगोळ गावी गुरुगृही राहून त्यांनी अतिशय कष्टपूर्वक गायनविद्या संपादन केली. गुरूंच्या मनाप्रमाणे सूर लागत नाही म्हणून एकदा गुरूंनी त्यांना आडकित्ता फेकून मारला होता. या एका प्रसंगावरूनच भीमसेनजींनी केलेल्या परिश्रमांची, रियाजाची कल्पना येते. भीमसेनजींनी ज्या काळात गायनास सुरुवात केली, तो काळ म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीचा. त्या काळात संगीतातील घराणेशाही अधिक घट्ट होत होती. मात्र भीमसेनजींनी -किराणा घराण्याची वैशिष्टये राखत -यापलीकडे जाऊन स्वरसाधना केली आणि भीमसेनजी म्हणजे एक प्रचंड ताकदीचे स्वयंभू व्यासपीठच झाले.

१९४६ साली पुण्यातील हिराबागेत त्यांची पहिली जाहीर बैफील झाली व महाराष्ट्राला भीमसेनी गायकीचे प्रथम दर्शन झाले. त्यांच्या गायनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा भारदस्त, भरदार, गोल, सुरेल असा आवाज. त्यांच्या आवाजाचे मर्मस्थान किंवा त्यांच्या गाण्याचे शक्तिस्थान म्हणजे त्यांचा कानात घुमणारा, रुंजी घालणारा आवाज होय. त्यांच्या आवाजात रस आहे, वजनआहे, स्वर-शब्द पेलण्याची ताकद आहे. त्यांचा आवाज तिन्ही सप्तकांत लीलया फिरतो, तानपुर्‍याशी चटकन एकजीव होतो. त्यांचं श्वासावर जबरदस्त नियंत्रण आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या शक्तिस्थानांचा गाताना यथायोग्य उपयोग करण्याची प्रतिभाही त्यांच्याकडे आहे. स्वरांचा आनंद स्वतः घेत गाण्याच्या वृत्तीने ते रसिकांना संगीताचा पूरेपूर आनंद देतात. शास्त्रीय गायन, नाट्यगीत, ठुमरी, भजन या अनेक संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा आहे. त्यांची शब्दांची फेक व बंदिशींचे उच्चारण सौंदर्यपूर्ण असते. हिंदी, मराठी, कन्नड या तीनही भाषेतील त्यांचे अभंग लोकप्रिय आहेत. त्यांच्यासुप्रसिध्द अभंगवाणीमुळे अनेक संतपदे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहेत. त्यांचे ‘आता कोठे धावे मन’, ‘माझे माहेर पंढरी’, ‘काया ही पंढरी’,‘ तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’,  ‘ज्ञानियांचा राजा’ हे अभंग ऐकताना साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडतं. अभंगवाणी ही पंडितजींनी महाराष्ट्राला दिलेली भक्तिरसपूर्ण अशी अनमोल देणगी आहे.

त्यांनी देशात, परदेशात शास्त्रीय गायनाच्या अनेक मैफिली गाजवलेल्या आहेत. आपले गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ते पुणे येथे दरवर्षी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन करतात. गेली ५० हून अधिक वर्षे चालणार्‍या ह्या संगीत महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी भारतातील तसेच परदेशातीलही असंख्य श्रोते उपस्थिती लावतात. शास्त्रीय गायन व वादन, तसेच नृत्य क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत या महोत्सवात आपली कला सादर करण्यात धन्यता मानतात.

पुणे विद्यापीठाच्या ललितकला केंद्रात पंडित भीमसेन जोशी अध्यासन स्थापन झाले आहे. पंडितजी गेली पन्नास-साठ वर्षे अखंड संगीताची साधना करीत आहेत. त्यांना अनेक मान-सन्मान लाभले आहेत. संगीताचार्य, पद्मश्री, पद्मभूषण, पुण्यभूषण, स्वरभास्कर, तानसेन यांसारख्या अनेक पुरस्कारांनी व पदव्यांनी ते सन्मानीत आहेत. पुणे व गुलबर्गा विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट दिली, तर टिळक विद्यापीठानेही त्यांना डी.लिट. ही पदवी प्रदान केली आहे. नुकताच भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ त्यांना जाहीर झाला आहे. हा बहुमान जाहीर झाल्यानंतर संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केलेला आनंद व त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर , तसेच अवघ्या महाराष्ट्रातील मराठी जनांच्या मनातील आनंदाची लहर अनुभवल्यानंतर पंडित भीमसेन जोशी या गायकाचा ‘उच्च दर्जा’; या कलाकाराची ‘महानता’ आणि या माणसातील ‘माणूसपण’ आपल्या लक्षात येते.

बालगंधर्वबालगंधर्व
नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचे नुसते नाव जरी उच्चारले, तरी मराठी मनाच्या तरफा एकदम झंकारू लागतात. अच्युत बळवंत कोल्हटकर ह्यांनी महाराष्ट्राच्या दैवतांची नावे घेताना छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्याबरोबर बालगंधर्वांचीही गणना केली आहे. ही तीन नावे जादूच्या मंत्रासारखी आहेत. पु.ल. देशपांडे म्हणतात, ‘‘बालगंधर्व या नावाचा उच्चार केला किंवा ते नाव नुसतं कानी पडलं, तरी क्षणार्धातच जादूचं झाड फुलून यावं, तसं मराठी मन फुलून येतं किंवा जे मन असं फुलून येतं, त्याला मराठी मन म्हणायला हरकत नाही. बालगंधर्वांसारखा लोकोत्तर कलाकार शंभर वर्षांतून एकदाच जन्माला येतो. या रंगभूमीच्या बादशाहाने सुमारे चार तपे मराठी मनावर राज्य केलं.’’

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात नागठाणे या गावी जन्मलेल्या बालगंधर्वांनी मराठी रंगभूमीची मनोभावे सेवा केली. नाटकांतील नेपथ्य-सजावट, नाट्यसंगीत, नाट्याभिनय या क्षेत्रांत मनापासून उपासना करून स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण केली.

बालगंधर्वांच्या स्त्री भूमिका म्हणजे साक्षात ‘कायाप्रवेशच’. त्यांच्या नजरेत, मुद्रेत, हसण्यात, लाजण्यात, मुरकण्यात, चालण्यात, कपडे नेसण्यात साक्षात स्त्रीचा संचार झालेला आहे  असे वाटत असे.  ‘पुरुषाच्या देहातून स्त्रीचे सौंदर्य इतक्या मोहकतेने कधीच प्रकट झाले नसेल,’ असे आचार्य अत्रे यांनी बालगंधर्वांबाबत म्हटले आहे.

मराठी रंगभूमीला पडलेले सुंदर स्वप्न बालगंधर्वांच्या रूपाने सत्यात आले. सहजसुंदर अभिनय आणि केवळ गंधर्वांबरोबरच तुलना होऊ शकेल असा आवाज, म्हणूनच लोकमान्य टिळकांनी छोट्या नारायणाला ‘बालगंधर्व’ ही उपाधी दिली.बालगंधर्वांना सुंदर, मोहक आणि बोलका चेहरा लाभला होता. गोड गळ्याची देणगीही त्यांना जन्मजात लाभली होती. शास्त्रीय संगीताची बैठक उत्तम होती. भास्करबुवा बखले ह्यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले होते. नाट्यगीतांसह ख्याल, ठुमरी, गझल, दादरा, भक्तिगीते यांसारख्या गायन प्रकारांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. 

१९०५ मध्ये त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश केला. त्यांची शाकुंतल नाटकातील ‘शकुंतला’ व मानापमान नाटकातील ‘भामिनी’ या भूमिकांमुळे एक प्रतिभावंत कलाकार म्हणून त्यांचे नाव सर्वत्र झाले. स्त्री भूमिका करताना अभिनयक्षमता, अचूक निरीक्षण व  सौंदर्यदृष्टी असल्यामुळे स्त्री मनाचे सूक्ष्म भाव सहजपणे प्रकट करण्यात ते यशस्वी झाले. शकुंतला ते सिंधूपर्यंत त्यांच्या स्त्री भूमिकांमध्ये विविधता होती. त्यांच्या वेशभूषा व अलंकारांचे अनुकरण त्या काळातील स्त्रियाही करत असत.

१९१३ मध्ये त्यांनी गंधर्व नाटक मंडळी ही संस्था स्थापन केली. या संस्थेने संगीत रंगभूमीला सुवर्णकाळ दाखवला. संगीत सौभद्र, मृच्छकटिक, शाकुंतल, मानापमान, संशयकल्लोळ, शारदा, मूकनायक, स्वयंवर, विद्याहरण, एकच प्याला अशा अनेक संगीत नाटकांनी व त्यातील बालगंधर्वांच्या स्त्री भूमिकांनी रसिकांवर त्या काळी मोहिनी घातली होती. या नाटकांच्या प्रयोगांबाबत बालगंधर्वांच्या गीतांना २-३ वेळा वन्समोअर; सातत्याने ‘हाऊस फुल्ल’ होणारे प्रयोग आणि पहाटेपर्यंत चालणारे प्रयोग ह्या गोष्टी नित्याच्याच झाल्या होत्या. त्यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्याबरोबर केलेला ‘संयुक्त मानापमान’ या नाटकाचा प्रयोगही प्रचंड गाजला. त्यांनी एकूण २५ विविध नाटकांत भूमिका केल्या. साधारण १९१० ते १९३० हा कालखंड रंगभूमीचा, नाट्यसंगीताचा सुवर्णकाळ मानला जातो, तो प्रामुख्याने बालगंधर्वांच्या कर्तृत्वामुळेच.

१९३३ च्या सुमारास बोलपटांचे युग सुरू झाले. साहाजिकच रंगभूमीकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. बालगंधर्वांनीही प्रभातच्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटात संत एकनाथांची भूमिका केली. बोलपटात त्यांचे मन रमेना. त्यांचा ओढा रंगभूमीकडेच राहिला. १९३९ च्या सुमारास त्यांनी रंगभूमीवर पुरुष भूमिका  साकारल्या. पण त्यांच्या स्त्री भूमिकाच प्रेक्षकांना जास्त प्रिय होत्या. १९५५ रोजी त्यांनी ‘एकच प्याला’ नाटकात साकार केलेली सिंधू ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. त्यानंतर त्यांनी रंगभूमीवरून निवृत्ती घेतली. ह्या रसिकप्रिय कलावंताचा संगीत नाटक अकादमीने राष्ट्रपती पदक देऊन सन्मान केला. पुढे त्यांनापद्मभूषण ह्या पुरस्काराने गौरविले गेले. त्याआधी १९२९ सालच्या २४ व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

नाटकांमधील त्यांची अनेक पदे गाजली. शास्त्राचा बाज राखून, अभिनयाला अनुकूल असे गाणे त्यांनी गायले. त्यांची गाणी घरोघरी पोचली. नाट्यसंगीताच्या माध्यमातून बालगंधर्वांनी शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला हातभार लावला. एका अर्थाने त्यांनी शास्त्रीय संगीत सोपे करून रसिकांसमोर मांडले. नाट्यसंगीताची अभिरूची सामान्य रसिकांमध्ये निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य बालगंधर्वांनी केले. आपल्या हयातीतच आख्यायिका बनून राहिलेल्या या असामान्य कलाकाराची स्मृती रसिकांनी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या रूपाने जतन करून ठेवली आहे.
( बालगंधर्वांच्या जीवनावर श्रीमती हेमंती बॅनर्जी यांनी माहितीपट बनवलेला आहे. या माहितीपटास राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे.)

राम गणेश गडकरीराम गणेश गडकरी
मराठी साहित्यातील एक श्रेष्ठ नाटककार, विनोदकार आणि कवी. विशेषत: मराठी साहित्यात व रंगभूमीवर विनोद रुजवणारे व आपल्या प्रतिभेची छाप सोडणारे साहित्यिक म्हणून राम गणेश गडकरी अजरामर ठरले. बाळाराम या नावाने त्यांनी विनोदी लेखन केले, तर गोविंदाग्रज या टोपणनावाने त्यांनी काव्यलेखन केले. त्यांच्या कविता ‘वाग्वैजयंती’ (१९२१) या काव्यसंग्रहातून प्रसिद्ध झाल्या. ते स्वत:ला केशवसुतांचे सच्चे चेले म्हणवून घेत असत. पण तरीही गोविंदाग्रज केशवसुतांहून अनेक दृष्टींनी वेगळे होते.

गोविंदाग्रजांनी विपुल प्रमाणात प्रेमकविता लिहिली. त्यांना प्रेमाचे शाहीर असेच म्हटले जायचे. गुलाबी कोडे, गोड निराशा, पहिले चुंबन, मुरली, प्रेम आणि मरण, गोफ, ती कोण? अशा अनेक प्रेमकविता त्यांनी लिहिल्या.

क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा,  मग पुढे...

यांसारख्या शब्दांतून त्यांची विलक्षण प्रतिभा प्रभाव पाडून जाते. प्रेमभंगाचे दु:ख व्यक्त करताना ते एका कवितेत म्हणतात,

जगावाचुनी लाभतीस तर जग मी केले असते, तुझ्यावाचुनी जग परि आता हो असत्याचे नसते...
डोळ्यांपुरते जग नच असते रुप जगाला पुरते, प्रेमळ हृदया  परि निर्दय जग दगडाखाली पुरते...
होईल होईल वाटत होते तेच अखेरीस झाले, नाव घेतल्यावाचुन आता मनात झुरणे आले...
या ओळींमधून व्यक्त झालेली प्रेम-निराशेची तडफड इतकी जिवंत आणि भेदक आहे की या अवस्थेतून गेलेल्या कुणालाही ती आपलीशी वाटेल. गोविंदाग्रज हे प्रेमाचे शाहीर होतेच, पण त्यांनी महाराष्ट्राला एक देणं देऊ केलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्र गीताचं. त्यांच्या एका कवितेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रेरणादायी, यथार्थ वर्णन केले आहे.

‘‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा।
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा ।।
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा ।
बकुळ फुलांच्या प्राजक्तांच्या दळदारी देशा।।
भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा ।
शाहिरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा ।।’’
काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम केले, तसेच ‘ज्ञानप्रकाश’ मध्ये उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यातूनच पुढे त्यांचा नाटक मंडळींशी, नाट्यलेखनाशी संपर्क आला. कल्पकता, बुद्धिमत्ता आणि भाषाप्रभुत्व या तीनही शक्ती गडकरी यांना प्रमाणाबाहेर लाभल्या होत्या. म्हणूनच ते नाटककार म्हणूनही विलक्षण यशस्वी ठरले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या विनोदी लेखनाचा, नाट्याचा त्यांच्यावर प्रभाव होता. बालपणापासूनच साहित्याची ओढ लागल्याने वयाच्या सतराव्या वर्षीच ‘मित्रप्रिती’ नावाचे नाटक त्यांनी लिहिले. त्यानंतर १९१३ मध्ये रंगभूमीवर आलेले ‘प्रेमसंन्यास’ हे त्यांचे पहिले नाटक होय. नंतर अनुक्रमे पुण्यप्रभाव (१९१७), एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) ही नाटके रंगभूमीवर आली.  ‘राजसंन्यास’ हे त्यांचे अपूर्ण राहिलेले नाटक. त्यांच्या नाटकांबरोबरच त्यांच्या नाटकातील काही पात्रेही अजरामर ठरली. एकच प्याला या नाटकातील सिंधू, तळीराम, सुधाकर किंवा भावबंधनमधील घनश्याम, धुंडीराज, प्रेमसंन्यासमधील गोकूळ ही पात्रे आजही मराठी कलावंतांना आणि रसिकांना आनंद देतात. ‘वेड्यांचा बाजार’ हे त्यांचे अपूर्ण नाटक पुढे चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.

करुण आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिती आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकतेने त्यांनी साधलेली दिसते. त्यांच्या कथांतून निखळ विनोदाबरोबरच उपहासात्मक व्यंगही ठळकपणे आढळते. रिकामपणाची कामगिरी (१९२१), संपूर्ण बाळकराम (१९२५) यांतून त्यांचे विनोदी लेखन प्रसिद्ध झाले. याशिवाय गडकरी यांचं बरंचसं अप्रकाशित लेखन आचार्य अत्रे यांनी १९६२ मध्ये ‘अप्रकाशित गडकरी’ या नावाने प्रसिद्ध केले. नाट्यलेखन व विनोदी लेखन या क्षेत्रांत आचार्य अत्रे यांनी राम गणेशांची परंपरा पुढे समर्थपणे चालवली.

या सर्वच साहित्य प्रकारात यांच्या लेखणीने आपला स्वत:चा ठसा उमटवला. पण मराठी साहित्यक्षेत्रात अजरामर ठरलेल्या त्या लेखणीमागच्या कलावंताने- राम गणेश गडकरी यांनी -मात्र वयाच्या ३४ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे


शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे


सह्याद्रीचा एकेक कडा आणि एकेक शिखर हे ज्यांच्यासाठी चरित्रनायक आहेत. एकेक किल्ला हा ज्यांच्या महाकाव्याचा एक-एक अध्याय आहे, असे ज्येष्ठ इतिहासकार म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होत. ‘इतिहासातून राष्ट्राचे शील शोधायचे असते, केवळ तहांचा आणि लढायांचा तपशील नव्हे’ असा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ज्यांनी शिवचरित्र हे एकमेव जीवितध्येय साकार केले अशी विभूती म्हणजेच मराठी इतिहासाचे भाष्यकार, शिवशाहीर बळवंत मोरेश्वर पुरंदरे होत. त्यांच्या लेखनातून व व्याख्यानांतून शिवकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे.

’इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे म्हणणारे बाबासाहेब हे एकमेवाद्वितीयच! त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली.

पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदर्‍यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनीअथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत. याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. ‘जाणता राजा’ या महानाट्याचे गेल्या २३ वर्षांत ८०० हून अधिक प्रयोग झाले आहेत व या प्रयोगांच्या माध्यमातून लाखो रुपयांची मदत बाबासाहेबांनी अनेक संस्थांना केली आहे. हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे.

इतिहासाचा ध्यास घेतलेले बाबासाहेब हे तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळून संपर्कात होते. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’ मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच! स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते.

आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला, लाभतो आहे. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. ’शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.

इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा -वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषण क्षमता आणि प्रेरक इतिहास अभिव्यक्त करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाचे खास गुणधर्म. या सर्व गुणांमुळेच ते आज संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील शिवभक्तांच्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक अभ्यासकांची शिवचरित्र अभ्यासाची वाटचाल सुरू झाली आहे.

भूतकाळाचा अर्थ उमगून इतिहासाच्या अभिमानासह आजच्या पिढीला वैभवशाली भविष्याकडे नेण्यासाठी बाबासाहेबांनी आपले आत्तापर्यंतचे आयुष्य वाहिले आहे असे म्हणणे गैर ठरणार नाही. आजही (वयाच्या ८६ व्या वर्षी) बाबासाहेब तितक्याच उत्साहाने, समरसतेने कार्यरत आहेत.