रविवार, १९ जून, २०११

पु.ल.देशपांडे


पु.ल.देशपांडे
साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व आदी क्षेत्रांत ज्यांना अभिव्यक्तीची ‘अमृतसिद्धी’ साध्य झाली होती आणि ज्यांची ‘साठवण’ मराठीजनांनी अनंत काळासाठी मनामनात करून ठेवली आहे असे ‘आनंदयात्री’!
महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनाजवळचं व्यक्तिमत्त्व म्हणजे पु. ल. देशपांडे. सर्वसामान्य मराठी माणसाचं प्रेम, आपुलकी, आदर, त्यांच्याबद्दलचा अभिमान... आदी भावनांचं सर्वाधिक प्रकटीकरण ज्यांच्याबाबत महाराष्ट्रानं अनुभवलं ते व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे! त्यांच्याबद्दल लिहायला शब्द अपुरे पडतील. केवळ लेखक नव्हे तर बहुआयामी असणारं असं व्यक्तिमत्त्व. लेखनातही तोचतोचपणा नाही. निबंध, समीक्षण, नाटक, प्रहसन, एकांकिका, अनुवाद, पटकथा, व्यक्तिचित्रण, चिंतनात्मक लेखन अशा अनेक लेखनप्रकारात त्यांच्या लेखणीने हुकूमत गाजवली. गांधीजींचं चरित्रलेखन, बंगाली भाषेचा अभ्यास, रवींद्रनाथांच्या कवितांचा अनुवाद याही वेगळ्या प्रकारच्या लेखनातून पु. ल. आपल्याला भेटतात. साहित्य, संगीत, नाटक, वक्तृत्व, अभिनय.... कलेच्या ज्या ज्या प्रांतात पु.ल. वावरले त्या त्या प्रांताचे ते अनभिषिक्त सम्राट झाले. अभिनय, एकपात्री अभिनय, हार्मोनियम (संवादिनी) वादन, कथाकथन, स्वत:च्या लेखनाचे सादरीकरण, अभिवाचन, नाट्य व पटकथा लेखन, दिग्दर्शन, काव्यवाचन... या प्रत्येक क्षेत्रात पुलंनी अतिशय उच्च दर्जाचे यश प्राप्त केले, अफाट लोकप्रियता मिळवली, आपला श्रेष्ठ दर्जा सिद्ध केला.

वयाच्या १६ व्या वर्षी ‘आजोबा हरले’ या प्रहसनापासून पु. लं ची लेखनयात्रा चालू झाली. पुढे पूर्वरंग, अपूर्वाईतून त्यांनी प्रवास घडवला, कधी व्यक्ती आणि वल्लीतून अनेकांची भेट घालून दिली, कधी मर्ढेकर-आरती प्रभू-बोरकरांच्या कविता प्रभावी काव्यवाचनातून रसिकांपर्यंत समर्थपणे पोहोचवल्या, बटाट्याच्या चाळीचा फेंरफटका घडवला. असे हे ‘कोट्याधीश’ पु.ल. रसिकांच्या मनात घर करून राहिले.

पु. ल. नी एकूण १४ एकांकिका लिहिल्या. ती फुलराणी, तुज आहे तुजपाशी, सुंदर मी होणार अशी उत्तमोत्तम नाटकं लिहिली. नाट्यदिग्दर्शन, अभिनय या क्षेत्रांतही आपला ठसा उमटवला. ‘अंमलदार’ हे पु. लं. नी रूपांतरित केलेलं पहिलं नाटक. अनुवाद किंवा रूपांतर हा पु. लं. च्या विविध पैलूंमधला आणखी एक पैलू. इतर भाषिक नाटकांचं रूपांतर करताना त्याचं भारतीयीकरण, मराठीकरण मोठ्या कौशल्यानं पु. लं. नी केलं. १९४७ साली ‘कुबेर’ या चित्रपटातून पु. लं. चं पहिलं दर्शन झालं. संवादलेखक, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, नायक, गीतकार, संगीतकार अशा अनेक भूमिकांमधून चित्रपटक्षेत्रात पु. लं. वावरले. त्यांचा गुळाचा गणपती हा चित्रपट ‘सबकुछ पु.ल.’  म्हणूनच गाजला. ही त्यांची कारकीर्द १९९३ च्या ‘एक होता विदूषक’ इथवर बहरली. त्यातले त्यांचे संवाद प्रत्येकाला भावले, अभिजाततेचा अनुभव देऊन गेले.

भास्कर संगीतालयाच्या दत्तोपंत राज्योपाध्यांकडून घेतलेलं हार्मोनियमचं शास्त्रीय शिक्षण हा  पु. लं. चा आणखी एक पैलू. पंडित भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, मिल्लिकार्जुन मन्सूर अशा दिग्गजांना त्यांनी हार्मोनियमवर समर्थ साथ केली. त्यांच्या हार्मोनियम वादनाच्या ध्वनिफितीही उपलब्ध आहेत.

सादरीकरणाचं विलक्षण व हमखास यशस्वी ठरणारं कर्तृत्व पु. लं. कडे होतं. त्यांचे हावभाव, शब्दफेक, देहबोली, आवाजावरचं नियंत्रण सगळंच विलक्षण आणि लक्ष वेधून घेणारं. बटाट्याची चाळ, वार्‍यावरची वरात, असा मी असा मी या प्रयोगांतून पु. लं. मधले ‘परफॉर्मर’ भेटतात. लेखन असो, वादन असो, गायन असो, नाटक किंवा वक्तृत्व सगळीकडे पु. लं. चं सादरीकरण थक्क करतं.

राजकारण हा पु. लं. चा प्रांत कधीच नव्हता. पण १९७५ च्या आणीबाणीच्या काळात त्यांच्या वक्तृत्वाला व विनोदाला उपहासाची धार आली. त्या काळात जयप्रकाश नारायणांच्या ‘प्रीझन डायरी’ चा त्यांनी मराठी अनुवाद करून लोकांपुढे साकार केला. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत जनता पक्षासाठी पु. लं. नी अनेक भाषणं केली. राजकारणात त्या काळापुरता पु. लं. मधला कार्यकर्ता आणीबाणीविरुद्ध लढला.

पु. लं. च्या साहित्यातून त्यांची अचाट निरीक्षणशक्ती, अनलंकृत प्रवाही संवादात्मक भाषाशैली, मराठी व संस्कृतवरील प्रभुत्व, संदर्भ श्रीमंती, भाषेतली लवचीकता, नावीन्य, भावस्पर्शी लिखाण आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे निखळ, निर्व्याज विनोद, कोणालाही न बोचणारा, दुखणारा विनोद या सगळ्या गोष्टी प्रामुख्यानं दिसतात. त्यांच्या लेखनासह, वक्तृत्वातही संदर्भांची श्रीमंती जाणवते. संस्कृत सुभाषिते, वेद-पुराणे, संतसाहित्य, म्हणी-वाक्‌प्रचार, यांसह विविध संस्कृतींमधले, जीवनव्यवहारातले अनेक संदर्भ पु. लं. च्या समृद्ध लेखनात आढळतात. यामुळेच त्यांची निवेदन-शैलीही उठून दिसते!

साहित्य-नाटक-संगीत या क्षेत्रात प्रवेश करणार्‍या नवोदिताला शाबासकीची थाप द्यावी ती पु.लं. नीच. ‘ती फुलराणी’ करताना भक्ती बर्वे-इनामदारांना हाच अनुभव आला. ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांचं गायन ऐकून ते आवडल्याचं कळवणारा फोन रात्री ११:०० वाजता करून प्रोत्साहन देणारे पु. ल. वेगळेच. तरुण संगीतकार सलील कुलकर्णींच्या बालगीतांच्या ध्वनिमुद्रिकेचं भरभरून कौतुक करणारे पु. ल. च होते. मुस्लीम समाजात काम करणार्‍या हमीद दलवाईंबद्दल पहिल्यांदा पु. लंनीच लिहिलं. एका अनोळखी दिग्गजाची ओळख सामान्य वाचकांना करून दिली. समोरच्या व्यक्तीमधल्या चांगल्या गोष्टी ओळखून त्या इतरांना सांगण्याची क्षमता फार कमी लोकांकडे असते आणि त्यापैकी एक पु. ल. होते.

पु.लं. मधला दाता खूप जणांना अनोळखी असेल. सामाजिक बांधिलकी कृतीशीलतेने मानणार्‍या पु. ल. व सुनीताबाई या दांपत्याने बाबा आमटे, अनिल अवचट, बाबा आढाव, हमीद दलवाई आदी अनेक कार्यकर्त्यांना, सामाजिक संस्थांना, त्यांच्या विविध उपक्रमांना कोणताही गाजावाजा न करता, सहजपणे व सढळतेने सहकार्य केले. सुनिताबाईंसारख्या सहधर्मचारिणीच्या प्रयत्नातून पु. ल. देशपांडे फाउंडेशन उभं राहिलं. या फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी पुढील संस्था - व्यक्तींना मदत केली.

-  अंध व्यक्तींसाठी देणगी - उत्तमोत्तम मराठी साहित्य ब्रेल लिपीत आणण्यासाठी आर्थिक मदत.
-  वेश्यांच्या मुलांसाठी चालवल्या जाणार्‍या निहार या संस्थेला सहकार्य.
-  कोयना भूकंपग्रस्त मुलांसाठी मदत.
-  ग्रामीण स्तरावरील शास्त्र प्रयोगशाळेलाही मदत.
-  मुंबई येथील एशियाटिक सोसायटी या संस्थेला सहकार्य.

कलाक्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानामुळे पु. ल. देशपांडे पहिल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी ठरले. पु. लं. ना पुण्यभूषण, पद्मश्री, पद्मभूषण या पुरस्कारांसह संगीत नाटक अकादमी पुरस्कार व साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला. मध्य प्रदेश, कलकत्ता, गोवा या राज्यांतूनही पु. लं. ना पुरस्कार मिळाले आणि हा मराठी साहित्यिक भौगोलिक, भाषिक व सांस्कृतिक  सीमा ओलांडून पार गेला.

‘जिवंत माणसाइतके जगात पाहण्यासारखे काही नाही’, अशी जीवनाकडं बघण्याची त्यांची वृत्ती आपले आयुष्य आणखी सुंदर बनवते. जीवन सुंदर करू पाहणार्‍या चार्ली चॅप्लीन आणि रवींद्रनाथ टागोर या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव पु. ल. देशपांडे यांच्या जीवनातून व अभिव्यक्तीतूनही स्पष्टपणे जाणवतो. त्यांना ‘महाराष्ट्राचे वुडहाऊस’ ही म्हटले जाते. अवघ्या महाराष्ट्रावर प्रदीर्घ काळ आनंदाची उधळण करणारा हा आनंदयात्री १२ जून, २००० ला जग सोडून गेला खरा, पण त्यांचं अस्तित्व आजही मराठी मनात शाबूत आहे.